पूजा खेडकरच्या आई-वडिलांकडे दोन कोटींच्या १२ मालमत्ता   

पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात तिच्या पालकांच्या नावावर तब्बल १२ मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे.
खेडकर हिच्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांबाबत नाशिक विभागीय आयुक्तांनी अहिल्यानगर जिल्हाधिकार्‍यांकडून मागविलेल्या अहवालात मालमत्तांचा उल्लेख आहे. याबाबतची पुढील सुनावणी येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. वडील दिलीप खेडकर हे वर्ग एक अधिकारी असूनही पूजा खेडकर हिने नॉन क्रिमिलेअर गटातून यूपीएससी परीक्षेत आयएएसचे पद मिळविले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी उपविभागीय अधिकार्‍यांनी हे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. नाशिक विभागीय आयुक्तांनी या प्रमाणपत्राबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अहिल्यानगर जिल्हाधिकार्‍यांनी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप व आई मनोरमा खेडकर यांच्या मालमत्तांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार या दोघांच्या पॅनकार्ड नोंदीवर असलेल्या मालमत्तांची माहिती घेण्यासाठी पुण्यातील नोंदणी महानिरीक्षकांना पत्र लिहून मालमत्तांची माहिती मागितली होती.
 
नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने ही माहिती जिल्हाधिकार्‍यांना पुरविली आहे. त्यानुसार मनोरमा खेडकर यांच्या नावे ५ लाख ६० हजार, ४२ लाख २५ हजार, १ लाख ५ हजार अशा तीन मालमत्तांची नोंद असल्याचे सांगितले आहे.
 
या तीनपैकी एका मालमत्तेचे बाजारमूल्य १४ लाख ६५ हजार असताना खरेदीखतामध्ये केवळ १ लाख ५ हजारांचा उल्लेख करण्यात आला आहे. या तिन्ही मालमत्तांचे एकत्रित मूल्य ४८ लाख ९० हजार रुपये इतके आहे, तर दिलीप खेडकर यांच्या नावे एकूण नऊ मालमत्ता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य १ कोटी ५६ लाख ९७ हजार ५०० रुपये इतके आहे.
 
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला असून, याप्रकरणी संबंधित विभागाने १० मार्च रोजी सुनावणी निश्चित केली होती. मात्र, सुनावणीस आणखी वेळ द्यावा, अशी मागणी खेडकर कुटुंबीयांकडून करण्यात आली. त्यानुसार पुढील सुनावणी येत्या आठवडाभरात घेतली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. आई-वडिलांच्या नावावर एकूण दोन कोटी रुपयांची मालमत्ता असताना सुद्धा खेडकर हिला नॉन क्रिमिलेअर कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोट्या कागदपत्रांवरून यूपीएससीने देखील तिचे आयएएस पद रद्द केले आहे. 
 

Related Articles